पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये बाॅम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली.
“एनआयए’ने या प्रकरणात आतापर्यंत मोहंमद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहंमद इम्रान मोहंमद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहंमद युनुस मोहंमद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर,
समीब नासिरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) या अकरा जणांना अटक केली आहे.
मोहंमद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहंमदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले.
त्यानंतर त्याला तपासासाठी “एनआयए’च्या ताब्यात देण्यात आले. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यात दरोडा टाकून आलेल्या पैशांतून बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. तर, बाॅम्ब कसा तयार करायचा, याबाबतचे प्रशिक्षण त्यांनी कोंढव्यात घेतले होते.
शिवाय कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलांमध्ये त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाॅम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. याप्रकरणात मोहंमद आलम, रिजवान अली. अब्दुलाह शेख यांच्याविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर “एनआयए’च्या पथकाने कोंढव्यातील मीठानगर परिसरातील इमारत जप्त केली.