पुणे : बांधकाम व्यावसायिकाची जमिनीच्या व्यवहारात 72 लाख रुपयांची फसवणूक आणि खंडणी प्रकरणात स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र जैन, निलंबित पोलीस शैलेश जगताप, त्याचा पुतण्या जयेश जितेंद्र जगताप (वय 30, रा. घोरपडे पेठ), बडतर्फ पोलीस परवेज शब्बीर जमादार आणि अमित विनायक करपे (वय 33, रा. सोमवारपेठ) या पाच जणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 20 जुलैपर्यंत वाढ केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (रा. सिंहगड रोड) आणि प्रकाश फाले (रा. सांगवी) या दोघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक ऋषीकेश बारटक्के (वय 35, रा. बाणेर) यांनी समर्थ पोलिसात फिर्याद दिली आहे. जून 2017 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादींना सेनापती बापट रस्त्यावरील एका जमिनीच्या दाव्याचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वास आरोपींनी दाखवला. त्यानंतर फिर्यादींनी जमिनीचा व्यवहार केला होता. परंतु, संशयित आरोपी यांनी बारटक्के यांची विविध मार्गाने तब्बल 72 लाख रुपये घेवून जमिनीचा ताबा न देता फसवणूक केली. तसेच जागेचा हक्क सोडण्यासाठी 2 कोटी आणि जागेच्या मालकाला अडीच कोटी रुपये देण्याची मागणी फिर्यादींकडे करण्यात आली.
व्यवहाराबाबत विचारणा केल्यानंतरही फिर्यादींच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने 5 जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी आणि इतर तपासासाठी सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिह ठोंबरे आणि ऍड. प्रसाद कुलकर्णी यांनी पोलीस कोठडीला विरोध केला.