राजगुरूनगर -आहे त्या जागेतच पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधावी व पुढील जागेत तालुक्यातील विविध कार्यालये एकत्र असणाऱ्या सचिवालयाची इमारत बांधा. याबरोबरच या कामाचे इस्टिमेट 4 ते 5 आर्किटेक्चरकडे पाठवा ज्याचे योग्य असेल त्याला हे काम द्या, असे आदेश बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
खेड पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी 5 कोटी निधी भाजप-सेना सरकारने मंजूर केला होता; मात्र ही इमारत कोणत्या जागेत बांधायची यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. पंचायत समितीच्या पुढील जागेत पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार होती. त्याचे भूमिपूजनही झाले; मात्र सरकार बदलले.
शिवसेनेचे आमदार गोरे पायउतार झाले तर माजी आमदार मोहिते पुन्हा निवडून आल्यानंतर पंचायत समितीच्या इमारतीसाठी ही जागा योग्य नसल्याचे त्यांनी सांगत या जागेत सर्व कार्यालये असलेले सचिवालय बांधावे व पंचायत समितीच्या जागेतच पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधावी असा आग्रह धरल्याने हे काम रखडले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज जुन्या इमारतीची पाहणी केली.
दरम्यान खेड तहसीलदार कार्यालयाच्या जुन्या इमारतीचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.