नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीने मंगळवारी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळापत्रकाची शिफारस केली. त्यानुसार, 29 जानेवारीपासून अधिवेशनाला प्रारंभ होईल. तर, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत घेण्याची शिफारस समितीने केली आहे.
पहिल्या टप्प्यात अधिवेशनाचे कामकाज 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत चालेल. तर, 8 मार्चपासून अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होईल. अधिवेशनाची सांगता 8 एप्रिलला होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक होईल.
त्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण होईल. समितीच्या शिफारसीनंतर आता अधिवेशनाच्या वेळापत्रकाविषयीचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ घेईल. देशातील करोना संकटाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, ते पूर्ण संपुष्टात आलेले नाही. ती बाब विचारात घेऊन अधिवेशन काळात आवश्यक ते निर्बंध आणि नियमांचे पालन केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.