लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. ब्रिटनमधील करोना संकटाची तीव्रता वाढल्याने जॉन्सन यांनी संबंधित निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जॉन्सन यांनी नियोजित भारत दौरा करता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा (26 जानेवारी) मुख्य सोहळा दिल्लीत होणार आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जॉन्सन यांना निमंत्रित करण्यात आले होते. ते निमंत्रण स्वीकारत जॉन्सन यांनी भारत दौराही निश्चित केला. मात्र, ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी करोना विषाणूचा नवा अवतार आढळला. त्यानंतर त्या देशातील करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
त्यामुळे ब्रिटनमध्ये नव्याने लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे. त्यापार्श्वभूमीवर, जॉन्सन यांनी मंगळवारी मोदी यांच्याशी संपर्क साधला. करोना संकटामुळे निर्माण होणारी स्थिती हाताळण्यासाठी मला ब्रिटनमध्येच थांबणे आवश्यक आहे.
त्यामुळे भारतात येऊ शकत नसल्याचा खेद वाटतो, अशी भावना जॉन्सन यांनी दूरध्वनी संभाषणावेळी व्यक्त केली. अर्थात, पुढील काही महिन्यांत नक्की भारत दौऱ्यावर येण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यानुसार चालू वर्षीच्या पहिल्या सहामाहीतच त्यांचा भारत दौरा होण्याची शक्यता आहे.