Manoj Jarange Patil : आज विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आशिष शेलार यांनी अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानाची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश दिले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार मागणी करण्यात आल्याचे पहायला मिळाले.
काय म्हणाले आशिष शेलार ?
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवलं असल्याचे म्हंटले. यावर आज विधानसभेत मनोज जरांगेच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत आशिष शेलार यांनी महाराष्ट्राला बेचिराख करण्याची भूमिका घेतली जात असेल तर विरोधी पक्ष आमच्यासोबत असेल. संपवून टाकू, निपटून टाकू, बोलण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आधी भुजबळ, मग उपमुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळं जरांगे यांच्या मागे कोण आहे? ते समोर येण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशीची मागणी आशिष शेलार यांनी केली.
“जरांगेंच्या विधानांमागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. तसेच जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचे देखील ते म्हणाले. दुसरीकडे विधानपरिषदेत प्रवीण दरेकर हे देखील जरांगेंच्या विधानांवरुन आक्रमक झाले. त्यांनी देखील त्यांच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच धमक्या देणाऱ्या जरांगेंना अटक करण्याची मागणी केली.