नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादरकेला. यावेळी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री चुकल्या आणि संसदेत एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनाही त्यांचे हसू आवरता आले नाही. मात्र, आपली चूक झाल्याचे निर्मला सीतारमण यांच्या लगेच लक्षात आले आणि त्याही हसल्या. त्यानंतर त्यांनी सभागृहात माफी मागत भाषणात दुरुस्ती केली.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री वाहनांच्या धोरणावर बोलत होत्या. त्यावेळी यांना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ असा उच्चार करायचा होता. मात्र, भाषणात त्या ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असे म्हणाल्या. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. निर्मला सीतारमण यांच्याही ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी ‘सॉरी’ म्हणत आपली चूक दुरुस्त केली.
याविषयी बोलताना, निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सॉरी. मला माहिती आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. जुनी प्रदुषित वाहनं बदलली जातील. हे धोरण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरणाचा उल्लेख होता. आता ही जुनी सरकारी वाहनं भंगारात काढण्यासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक निधीची तरतूद करण्यात येत आहे. राज्य सरकारंही जुनी सरकारी वाहनं आणि जुन्या रुग्णवाहिका बदलण्यासाठी सहभाग घेईल.”