कराड – डोक्यात दगड घालून युवतीचा खून करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील कार्वे- कोरेगाव रस्त्यालगत उसाच्या शेतात उघडकीस आली. संबंधित २५ वर्षीय युवतीचा मृतदेह सोमवारी (दि. 3) सकाळी आढळून आला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कार्वे- कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या भैरोबा मंदिराजवळ उसाच्या शेतामधून जाणाऱ्या वाटेवर युवतीचा मृतदेह आढळून आला.मृतदेहाशेजारीच मोठा दगड पडला होता. त्यामुळे तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाशेजरी पडलेला दगडाला रक्त लागले होते.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे. दरम्यान प्रथमदर्शनी संबंधित युवतीच्या डोक्यात दगड घातल्याचे स्पष्ट झाले आहे. युवतीचे नाव अद्याप समजू शकले नाही. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.