हैदराबाद – तेलंगणात सत्ताबदल होणार असल्याचा दावा कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी केला. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.
तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. त्यामुळे विविध पक्षांचे प्रमुख नेते प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होत आहेत. प्रियंका यांनीही त्या राज्यात सभा घेऊन प्रामुख्याने सत्तारूढ बीआरएसवर टीकेची झोड उठवली. तेलंगणात बीआरएस, भाजप आणि एमआयएमध्ये संगनमत झाले आहे. राज्यात भाजप बीआरएसला पाठिंबा देतो.
तर, केंद्रात बीआरएस पक्ष भाजपच्या पाठिशी असतो. इतर राज्यांमध्ये 30 ते 40 जागा लढवणारा एमआयएम तेलंगणात केवळ 9 जागा लढवत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भ्रष्टाचारात मग्न राहिलेले बीआरएस सरकार जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करू शकले नाही.
त्या सरकारने तरूण, महिला आणि शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला. बेरोजगारीच्या बाबतीत तेलंगणा देशातील राज्यांच्या यादीत वरच्या स्थानी आहे. बीआरएस सरकारला तरूणांना रोजगार पुरवण्यात सपशेल अपयश आले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.