लंडन – ब्रिटन मधील सत्तारूढ पक्षाला दोन जागांवरील पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना हटवण्याच्या हालचाली ब्रिटन मधील कॉन्झरव्हेटीव्ह पक्षात सुरू झाल्या आहेत. त्यांना पदावरून त्वरीत हटवण्याची मागणी पक्षातल्या काही बंडखोर खासदारांनी केली आहे.
दोन पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर त्या पाठोपाठ त्यांचे एक सहकारी ओलिव्हर डॉऊडेन यांनी टोरी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने पंतप्रधानांना लागोपाठ तीन धक्के बसले. पक्षाच्या दोन खासदारांनी पंतप्रधानांना उघड आव्हान देत त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूकही लढवण्याची घोषणा केल्याने पंतप्रधान जॉन्सन यांची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे असे सांगण्यात येते.
58 वर्षीय जॉन्सन यांच्या विरोधात याच महिन्यात सुरूवातीला अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यातून ते कसेबसे बचावले होते. पंतप्रधान जॉन्सन सध्या राष्ट्रकुल बैठकीसाठी रवांडा येथे आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, आपण विदेशात असताना आपल्याला पदावरून घालवून देण्याचा प्रयत्न होणार नाही. पोटनिवडणुकीत झालेला पराभव मान्य आहे. जनतेने राज्यकर्त्यांना त्याद्वारे संदेश दिला आहे. त्याचा आम्ही अभ्यास करून कोठे काय चुकले याची माहिती घेऊन त्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.