पुणे – राज्यात गेली चार-पाच दिवस सुरू असलेल्या सत्ताचक्रात कोणी कुठेही जाऊ द्या. शिवसेना हा हिंदुत्वाचा विचार आहे, पुणे जिल्ह्यातील शिवसैनिक कुणाच्याही मागे जाणार नाहीत. जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत, असे शिवसेना राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्य, पुणे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
मुुंबई येथे शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाची अत्यंत तातडीची व महत्वाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 25) शिवसेनाभवन (दादर) येथे झाली. त्यानंतर आपली भूमिका मांडताना कटके बोलत होते.
ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, शिवसेनेचे काही आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यामध्ये आजी व माजी आमदार आणि नगरसेवकांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. परंतु, पक्ष अडचणीत असताना पक्षाबरोबर राहणे गरजेचे आहे. शिवसेनेने जिल्हा अध्यक्ष सारखे मोठे पद मला दिले, सामान्य पदाधिकाऱ्यांना मोठी संधी देण्याची मोठी परंपरा शिवसेनेची आहे.
आज, बाहेर पडलेले आमदार कधीकाळी सामान्य कार्यकर्तेच होते. शिवसेना ही कार्यकर्त्यांचा विचार करणारी आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानून त्यांच्या सोबत राहणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शिवसैनिक कुणाच्याही मागे जाणार नाहीत. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत. जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे, त्या ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आम्ही सर्वजण आहोत. पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी कुठेही गेलेले नाहीत आणि जाणार नाहीत. हिंदूहृदय सम्राट यांचे मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील, असा मला विश्वास आहे, असेही कटके यांनी स्पष्ट केले.