पिंपरी – पेट्रोल पंप मंजूर करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका मंत्रालयीन कर्मचाऱ्याने विधवा महिलेकडून लाच घेतली. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित केले.
महेंद्र नांदले (वय 40) असे निलंबित मंत्रालयीन कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिघी येथील लष्करातून निवृत्त झालेल्या दिवंगत लोकप्रतिनिधीच्या पत्नीने स्वतःच्या मालकी जागेत मुलाच्या नावे पेट्रोल पंप मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, भारत पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल पंप देखील मंजूर केला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात जागेवर पोलीस ठाण्याचे आरक्षण असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलेने दुसऱ्या जागेवर पेट्रोल पंप मिळण्याची मागणी केली. कंपनीने पोलिसांची हरकत असल्याचे प्रमाणपत्र दिल्यास नवीन जागेत पेट्रोल पंप मंजूर करू, असे सांगितले.
तत्कालीन मंत्रालयीन महिला कर्मचाऱ्याने महिलेला प्रमाणपत्रही दिले. मात्र, त्यामध्ये काही त्रुटी असल्याने भारत कंपनीने दुसरे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदार महिलेची मुलगी आयुक्त कार्यालयात येऊन सध्या नियुक्तीस असलेल्या नांदले याला भेटली. नांदले याने पैशांची मागणी केली. प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार महिला आणि त्यांच्या मुलीने नांदले याच्या ‘फोन-पे’वर एकूण साडेआठ हजार रुपये पाठवले. तसेच, वेळोवेळी रोख पैसे दिले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिलेला बोलावून चौकशी केली. महिला आयुक्तांकडे गेली असल्याचे कळताच नांदले याने महिलेच्या ‘फोन-पे’वर माघारी पैसे पाठवले. मात्र आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले.