चंद्रपूर – तब्बल पन्नास लाख रुपये लाच स्वीकारताना जलसंधारण विभागाचे तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे, नागपूर येथून प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील आणि चंद्रपूर येथून जलसंधारण कार्यालयाचे विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम अशी अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणआचे काम केले होते. या कामाचे बिल काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 81 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 50 लाख रुपयाची लाच स्वीकारताना श्रावण शेंडे यांना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. संबंधित तीनही अधिकाऱ्यांविरोधात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.