पुणे – शहरातील करोनाच्या नव्या बाधितांचा आलेख काहीसा उतरण्यास सुरुवात होताच आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळत आहे. 6 मे अखेर शहरातील करोना रुग्ण दुपटीचा कालावधी 100 दिवसांवर आला आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच हा कालावधी अवघ्या 11 दिवसांवर आला होता. मात्र, एप्रिलच्या चौथ्या आठवड्यांपासून नवीन बाधितांचा आकडा घसरणीला लागल्याने हा कालावधी 100 दिवसांवर गेला आहे. तर गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच शहरात ऑक्सिजन असलेले 675 बेड शिल्लक असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताणही काही प्रमाणात कमी झाला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दोन महिन्यांत शहरात अडीच लाखांपेक्षा अधिक बाधित सापडले आहेत. या कालावधीत ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. परिणामी, मार्चअखेरीस तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरात एकही ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. रोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा तब्बल 7 हजारांजवळ पोहोचला होता. त्यामुळे 2 एप्रिलपासून शहरात लॉकडाऊनची सुरुवात करण्यात आली. 8 एप्रिलला आणखी निर्बंध वाढवण्यात आले, तर 14 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आले.
त्यानंतर आता 15 मेपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून गेल्या महिनाभरापासून पुण्यात वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून शहरातील रुग्णसंख्या 18 एप्रिलपासून लक्षणीय घटण्यास सुरुवात झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांवर आला होता. तोच कालावधी 25 एप्रिलच्या आसपास 52 दिवस, तर 6 मेअखेर तो 100 दिवसांवर आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अशीच कमी होत गेल्यास हा कालावधी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
पहिल्यांदाच 1500 बेड शिल्लक
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महापालिकेने खासगी रुग्णालयांचे ताब्यात घेतलेले बेड तसेच पालिकेने सुरू केलेल्या ऑक्सिजन बेड तसेच इतर बेडची संख्या सुमारे 10 हजार 763 असून त्यातील तब्बल 1,465 बेड रिकामे आहेत. त्यात सुमारे 664 ऑक्सिजन बेड आहेत, तर 8 आयसीयू आणि 3 व्हेंटिलेटरवरील बेड आहेत. याशिवाय ऑक्सिजनची सुविधा नसलेले साधे 790 बेड खासगी तसेच पालिकेच्या कोविड रुग्णालयात शिल्लक आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बेड शिल्लक असल्याने आरोग्य व्यवस्थेलाही श्वास घेण्याची संधी मिळाली आहे.