मुंबई – पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रात्री पावणे एक वाजताच्या सुमारास संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर राऊतांना न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयातील युक्तीवादानतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
ही सुनावणी न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांच्यासमोर पार पडली. या युक्तीवादावेळी ईडीने 8 दिवसांची कोठडी मागितली होती. पण संजय राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद केले. तसेच, संजय राऊत यांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे. त्यामुळे 8 दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने ईडीची विनंती अमान्य करत 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.
सोमवारी जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. संजय राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला. त्यावेळी संजय राऊत यांच्या मालकीच्या काही कंपन्या असून, या व्यवसायातून त्यांनी वैध मार्गाने पैसे कमावले. त्यांचा या घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नसल्याचे ऍड. मुंदरगी यांनी म्हटले. त्यावर पत्रा चाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचे ईडीच्या वकिलांनी म्हटले. दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री 10.30 नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही, अशी हमी यावेळी ईडीने न्यायालयात दिली.