आळेफाटा – आळेफाटा (ता. जुन्नर) आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कोल्हापूर व सांगली येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हात सरसावले असून भाकरी-चटणी व बिस्किटांचे संकलन करण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगली येथील काही भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम पोलीस व एनडीआरएफचे जवान करीत आहेत.
पूरग्रस्त नागरिकांना वेळेवर अन्न मिळत नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत, ही बाब लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. आळेफाटा, वडगाव आनंद, आळे, कोळवाडी, संतवाडी येथील नागरिकांनी व सेवाभावी संस्थांनी मदत दिली आहे. बिस्किटांचे 150 बॉक्स तर आळे येथील महिला बचत गटामधील महिलांनी व आळे ग्रामस्थांनी सुमारे दीड हजार भाकरी व त्यासोबत लसूण व शेंगदाण्याची चटणी पाकिटे तयार करून दिली आहेत. यावेळी 35 कट्टे तांदूळ, पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्सही पाठविण्यात आले आहेत. आज, हे सर्व खाद्यपदार्थ घेऊन दोन टेम्पो पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले आहेत, त्या ठिकाणी या साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे येथील संयोजकांनी सांगितले.