पिंपरी – चापेकर चौक, चिंचवडगाव येथील चापेकर वाचनालय असलेल्या उद्यानात साफसफाई होत नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने करण्यात आली. मात्र चापेकर चौकातील ते उद्यान अ प्रभागाच्या हद्दीत येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अ प्रभागात तक्रार करायला गेल्यावरही ते ब प्रभागात तक्रार करा, असे सांगत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. यामुळे पोलिसांप्रमाणे महापालिकेतही आता हद्दीचा वाद आल्याचे दिसून आले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा घेण्यास सुरवात झाली आहे. या जनसंवाद सभेलाही हद्दीच्या वादाचे ग्रहण लागले. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीबाबत ते उद्यान अ प्रभागात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच चिंचवड स्टेशन येथील एका व्यापाऱ्याने ड्रेनेज, पाणी, मिळकतकर आणि सार्वजनिक जागेतील अतिक्रमण याबाबत तक्रार केली. मात्र सदरची जागा ही अ प्रभागात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे तुम्ही अ प्रभागात जाऊन जनसंवाद सभेत तक्रार करा, अशी सूचना वजा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला.
त्या समाजसेवकाने व्यक्त केली दिलगिरी
जनसंवाद सभेत एका समाजसेवकाने आरडा-ओरडा करीत कागद फाडत अधिकाऱ्यांच्या अंगावर भिरकावली. त्यानंतरच्या जनसंवाद सभेत जमिनीवर बसून आंदोलन केले. त्यानंतरच्या जनसंवाद सभेत प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. याचा योग्य तो परिणाम दिसून आला. गेल्य दोन जनसंवाद सभेत ते समाजसेवक गैरहजर होते. मात्र सोमवारी (दि. 25) झालेल्या जनसभेस हजर राहून कागद फाडून अंगावर टाकल्याप्रकरणी त्या समाजसेवकाने दिलगिरी व्यक्त केली. तसेच प्रशासनाच्या काळात कामे होत असल्याचेही त्या समाजसेवकाने आवर्जून सांगितले.
सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेत अनधिकृत बांधकामांबाबत सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच अनेक तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचे उत्तर प्रशासनाकडून दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली. आलेल्या तक्रारीमध्ये काळेवाडीत नदीकिनारी होत असलेली अनधिकृत बांधकामे आणि त्यासाठी चोरून घेतलेला पाणी पुरवठा याबाबत तक्रारी आल्या.
मला न विचारता अनधिकृत बांधकाम केले
एका ज्येष्ठ नागरिकाने सोसायटीत वॉचमनसाठी अनधिकृतपणे खोली बांधल्याची तक्रार केली. यावर काही अधिकाऱ्यांनी तुमच्या सोसायटीच्या रक्षणासाठी ती खोली बांधली असेल ना, अशी विचारणा केली. मात्र सोसायटीच्या अध्यक्षाने मला न विचारता ते बांधकाम केले आहे. त्यामुळे ते पाडून टाका, असा आग्रह धरला. त्यावर ते बांधकाम पाडले जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.