कोल्हापूर – अनैतिक संबधात पहिला प्रियकर सुशांत मोरे हा अडथळा ठरत असल्याने याच्या डोक्यात लाकडी बॅटने फटके मारून खून केला. वाठार तर्फ वडगांव येथे २०१४ मध्ये हा खून झाला होता. यातील आरोपी संतोष पुंडलिक कापसे (वय २४ रा पेठ वडगांव), दमयंती राजू यादव (वय ३० रा. इचलकरंजी) या दोघांना दोशी ठरवून दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश बी. डी. शेळके यांनी जन्मठेप व ३ हजार दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकारी अभियोक्ता ॲड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी, आरोपी दमयंती यादव ही दत्ता मोरे यांच्याकडे कामाला होती. त्यामुळे मोरे यांचा मुलगा सुशांत व दमयंती यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. मोरे यांचे काम बंद झाल्यानंतर दमयंती संतोष कापसे याच्या सातारा येथील हॉटेलमध्ये कामाला लागली होती. या दरम्यान संतोष व दमयंती यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले.
दमयंती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याचे सुशांत मोरे याला समजल्यावर त्याने भांडण काढले. त्यानंतर दमयंती व संतोष कापसे वाठार तर्फ वडगांव येथे एकत्र राहू लागले. हे सुशांतला समजल्यावर तो तेथे आला. मात्र दमयंती व संतोष यांच्या अनैतिक संबंधात तो अडथळा ठरत असल्याने दोघांनी जुन २०१४ मध्ये सुशांतच्या डोक्यात लाकडी बॅटचे फटके मारून त्याचा खून केला. व मृतदेह गोनपाटात घालून मोपेडवरून नेऊन निलेवाडी ते ऐतवडे या रोडवर फेकला.
पेठ वडगांव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी तपास करून पुराव्यासह न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधिश शेळके यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी १७ साक्षीदार तपासले. समोर आलेले पुरावे, सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.