सोमाटणे (वार्ताहर) – पवना नदीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. बेबड ओहोळ (ता. मावळ) येथे शुक्रवारी (दि. 1) दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय 32, रा. मुळशी) व आर्यन दीपक आलम (वय 13, रा. बेबड ओहोळ, ता. मावळ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष घारे, आर्यन आलम हे दोघे शुक्रवारी (दि. 1) सकाळी साडेअकराच्या सुमारास नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेले होते. त्यावेळी ते पाण्यात बुडाले. यातील संतोष घारे यांचा मृतदेह रात्री हाती लागला, तर आर्यनचा मृतदेह शनिवारी (दि.2) सकाळी सातच्या सुमारास आढळून आला. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर पवना नदीच्या पात्रात आर्यनचा मृतदेह दिसल्याची खबर मंगेश घारे यांनी शिरगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.
संतोष हा विवाहित असून, एक दिवसापूर्वी तो बेबड ओहोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहोताना दोघेही पाण्यात बुडाले.
दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच “एनडीआरएफ’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचा शोध घेतला. या प्रकरणी शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.