लोणावळा (वार्ताहर) – करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांबाबत घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती देत मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी नवीन आदेश दिले आहे. या आदेशानुसार मावळ तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, आस्थापने दररोज सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊन असतानाही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली बाजारभागात नागरिकांची होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन त्या-त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस प्रशासनापुढे उभे आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव, वडगाव यासारख्या ठिकाणी परिस्थितीनुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वेळा आणि वेगवेगळे दिवस (वार) ठरवून देण्यात आले होते. परंतु आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या अस्थापनांबाबत जाहीर केलेल्या नवीन आदेशामुळे यापूर्वीचे सर्व स्थानीय आदेश स्थगित करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांबाबत अनेक तक्रारी उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जीवनावश्यक सेवा अंतर्गत वस्तूंची विक्री व पुरवठा करणाऱ्या आस्थापनांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले आहे. यापुढे अशा सर्व अस्थापना केवळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उघडता येणार आहे. मात्र शेती आणि शेतीविषयक कामांसाठी हे निर्बंध लागू राहणार नसून, दूध वाहतूकदार आणि औषधांच्या दुकानांना हे निर्बंध लागू राहणार नाही. याशिवाय घरोघरी दूध वितरण करणाऱ्या गवळ्यांसाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.