मुंबई : बॉलीवूडला दोन दिवसात मोठे दोन झटके बसले आहेत. हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांच्या निधनाला २४ तास पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सिनेसृष्टीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. ऋषी कपूर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, २४ तासांत बॉलिवू़डने दोन दिग्गज कलाकारांना गमावले आहे. बुधवारी अभिनेते इरफान खानच्या निधनामुळे बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशात गुरुवारी सकाळी त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. ऋषी कपूर यांचा कर्करोगाशी गेली दोन वर्षे दिलेला लढा अपयशी ठरला आहे. ॉ
कर्करोगामुळे बॉलिवूडला इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज कलाकारांना गमवावे लागले आहे. बुधवारी प्रकृती खालावल्यामुळे ऋषी कपूर यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व जण ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत होते. अशातच त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ वर्षी निधन झाले. २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.