मुंबई – करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यासाठी देशभर मोठ्या प्रमाणात निधी संकलन सुरू झाले आहे. त्यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, विक्की कौशल यांनी आपापले योगदान देण्याचे कबूल केले आहे. ज्या मार्गाने आपले आर्थिक योगदान या मदत निधीमध्ये देणे शक्य होईल, त्या मार्गाने बॉलिवूडमधील कलाकार मंडळी आपली देणगी जमा करत आहेत.
या कठीण प्रसंगी सरकारला मदत व्हावी म्हणून आपण मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपयांची देणगी देत असल्याचे लता दिदींनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या संकटसमयी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास यांनीही “पीएम-केअर्स’ निधीसह युनिसेफ, गुंज, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स, नो कीड हंग्री आणि साग-ऍफ्ट्रा यासारख्या 10 स्वयंसेवी संस्थांना देणगी दिली आहे. त्यांच्या देणगीची रक्कम मात्र त्यांनी जाहीर केली नाही.
कतरिना, आलिया भट आणि विकी कौशलने महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी आणि पंतप्रधान-केअर्स या दोन्ही ठिकाणी देणगी दिली आहे. विकी कौशलने तब्बल 1 कोटींची देणगी दिली आहे. सारा अली खान, अली फजल, सई ताम्हणकर, प्रकाश राज यांच्यासह अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, वरुण धवन, सोनम कपूर, राजकुमार राव, कार्तिक आर्यन, पवन कल्याण, प्रभास, राम चरण, महेश बाबू यांच्यासह अनेकांनी विविध मदतनिधींना देणगी दिली आहे