नेवेली: तामीळनाडूतील एनएलसी इंडिया औष्णिक वीज प्रकल्पात गुरूवारी बॉयलरचा स्फोट झाला. त्या दुर्घटनेत 8 कामगार भाजले. त्यातील दोघांची इजा गंभीर असल्याचे समजते.
बॉयलरचा स्फोट झालेला प्रकल्प तामीळनाडूच्या कुड्डलोर जिल्ह्यात आहे. संबंधित बॉयलर तब्बल 84 मीटर उंचीचा आहे. त्या बॉयलरशी संबंधित काम चालू असताना मोठ्या दाबामुळे अचानक स्फोट झाला.
त्यावेळी सुमारे 32 मीटर उंचीवर काम करत असलेल्या 2 तंत्रज्ञ आणि 6 कामगारांपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहचल्या. स्फोटानंतर तातडीने वीज निर्मिती थांबवण्यात आली. भाजलेल्या तंत्रज्ञ आणि कामगारांवर प्रकल्पातच प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी तिरूचिरापल्लीमधील खासगी रूग्णालयात हलवण्यात आले.