जमेका – ख्रिस गेल व रामनरेश सरवान यांच्यात आता वेस्ट इंडिजमधील टी-20 लीगबाबत घडलेल्या घटनांमुळे चांगलाच वाद रंगला आहे.
जमेका तलयवा संघातून काढण्यामागे सरवान कारणीभूत असल्याची टीका गेलने केली होती. तर असले घाणेरडे राजकारण मी करत नाही, उलट एका मुलाखतीत एका महिलेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने गेलला संघातून बाहेर काढण्यात येणार होते, त्यावेळी मी गेलसाठी पाठिंबा दिला व त्याची कारकीर्द वाचवली असा दावा सरवानने केला आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज गेल याने एका वाहिनीशी बोलताना सरवानला लक्ष्य केले होते. त्यावर सरवानने गेलने केलेले आरोप फेटाळले.
कॅरेबियन प्रिमीयर लीग स्पर्धेत गेल जमैका तलायवाज संघाकडून खेळत होता, पण यंदा त्याला संघाने स्थान दिले नाही. नंतर त्याने सेंट ल्युसिया झोक्स संघाशी करार केला. तलायवाज संघातून मला बाहेर काढण्यासाठी सरवानच जबाबदार आहे असे गेलने सांगितले होते. सरवान चांगला मित्र होता, मात्र, त्यानेच पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दात गेलने टीका केली होती. मात्र, सरवानने गेलचा दावा फेटाळला.
उलट गेलला नेहमी मीच सावरून घेतले होते. उलट गेलने एका महिला पत्रकाराबाबत आक्षेपार्ह विधान केले होते, तेव्हा गेलवर शिस्तभंगाची कारवाई होणार होती. तसेच त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले होते. त्यावेळी मी त्याच्या पाठीशी उभा होतो. मी गेलच्या नावासाठी आग्रह धरल्याने त्याची कारकीर्द वाचली असेही सरवान म्हणाला.