बारामती -बारामती ऍग्रो कंपनीचे शेअर्स ताबडतोब खरेदी करा, असे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पुण्यातून जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रुपेश दत्तात्रय काळे, असे अटकेतील भामट्याचे नाव आहे.
बारामती ऍग्रो कंपनीचे शेअर्स ताबडतोब खरेदी करा, भविष्यात बारामती ऍग्रो कंपनीचे शेअर्स खूप महाग होणार आहेत. अशी जाहिरात करीत टेलिग्रामपवर निफ्टी ऑप्शन ट्रेड ग्रुपवर टाकण्यात आली. हा ग्रुप रुपेश दत्तात्रय काळे याने बनवला होता. या ग्रुपला पाच हजार लोक संपूर्ण भारत व महाराष्ट्राचे जोडलेले आहेत. ते शेअर्स खरेदी करण्यासाठी त्याच्याशी संपर्क करुन त्याच्याकडे पैसे भरा, असे हा भामटा सांगत होता. ही माहिती बारामती ऍग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर प्रफुल्ल बाळासाहेब तावरे यांनी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
बारामती ऍग्रो कंपनीचे शेअर्स कधीही ओपन मार्केटमध्ये विकले जात नाहीत. त्याची सध्या खरेदी-विक्री होत नाही. तरी याप्रकारे कुणीतरी कंपनीची प्रतिमा खराब करून लोकांकडून फसवून पैसे घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी फिर्याद दिली. आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तांत्रिक पुरावा, मोबाइलच्या नेटवर्कवरून शोध
रुपेश काळे याने त्याच्या ग्रुपवर दिलेला पत्ता बोगस असल्याचे दिसून आले. त्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कोणतेही कार्यालय अस्तित्वात नाही. केवळ तांत्रिक पुरावा व मोबाईलवरील नेटवर्कच्या आधारे आरोपीला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके. अजित राऊत दशरथ इंगोले यांनी पुण्यात शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर आरोपीवर कोल्हापूर, वागळे इस्टेट ठाणे, हडपसर या ठिकाणी पूर्वी लोकांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.