बोड्डू नागा लक्ष्मी ही तीस वर्षांची युवती आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. खासकरून अशा लोकांसाठी जे अपयशामुळे खचून जाऊन हतबल होतात. आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात राहणारी ही लक्ष्मी एका डोळ्याने पाहू शकत नाही आणि एका डोळ्याने खूपच कमी प्रमाणात पाहू शकते. मात्र तरीही मेहनतीच्या जोरावर ती आज प्रसिद्ध यूट्यूब स्टार आहे. फूड यूट्यूबर लक्ष्मी “कविता नागा ब्लॉग्स’या नावाने यूट्यूब चॅनेल चालवते. या माध्यमातून ती आंध्रप्रदेशातील पारंपरिक खाद्य पदार्थ कसे बनवायचे ते शिकविते.
तिच्या चॅनेलवर जवळपास अडीच लाखांपेक्षा अधिक सब्सक्रायबर्स आहेत. तिच्या चाहत्यांना तिची जेवण बनवण्याची पद्धत आणि साधेपणा भावतो. यूट्यब चॅनेलवर या स्थानी पोहोचण्यासाठी अनेक मैलाचे अंतर पार केले आहे. त्यासोबत समाजासाठीही आपले योगदान देत आहे. मागील वर्षी तिने सूद चॅरिटी फाउंडेशन आणि मुख्यमंत्री साहायता निधीसाठी करोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी 25 हजार रूपयांची मदत केली. याशिवाय तिने आपल्या गावामध्ये युवकांना खेळ खेळण्यासाठी किट विकत घेण्यासाठी 60 हजार रूपयांची मदत केली.
लक्ष्मी सांगते की, यूट्यूबवर आपला ब्लॉग सुरू करण्यामागचा उद्देश हा होता की, लोकांनी तिचा जगण्याचा संघर्ष पाहावा आणि तिच्या स्वयंपाक कलेपासून काहीतरी शिकावे. फूड यूट्यूबर लक्ष्मी आपल्या उजव्या डोळ्यांनी केवळ 5 टक्के प्रमाणात पाहू शकते. मात्र तिने आपल्या आयुष्यात याला कधीही अडथळा मानला नाही. लक्ष्मी याबाबत म्हणते की, “मी पाहू शकत नसले म्हणून काय झाले, मी कोणकोणते पदार्थ बनवू शकते हे तर दुसरे लोक पाहू शकतात. ज्या लोकांना मी खाद्यपदार्थ बनवायला शिकवते त्यांना मी नेहमी चांगलीच दिसते.’
लक्ष्मीचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. यूट्यूब स्टार बनल्यानंतर तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली सुधारली आहे. नेल्लोरचा पप्पू चारू (आंध्रातील एक साधी डाळ) आणि रागी पुट्टू (एक पौष्टीक पदार्थ जो नाचणीचे पीठ आणि नारळापासून बनवले जाते आणि पुट्टू म्हणजे स्टीमरमध्ये शिजवले जाते) यासारखे अवघड पदार्थही ती अगदी साध्या पद्धतीने शिकविते.