शेवगाव – शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी कामे करतांना दुजाभाव करतात. त्याची चौकशी होवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरातील परिवर्तन वादी संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने येथील क्रांती चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुजारी यांच्याकडून काहींच्या बाबतीत नको तितकी आपुलकी तर काहींच्या बाबतीत अन्याय अशा प्रकारे दुजाभावाचे कामकाज सुरु असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, भाकपचे नांगरे, वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, माजी जि. प. सदस्य राम साळवे, बापु मगरे, रवींद्र नीळ, अनिल पहिलवान, माजी जि.प. सदस्य प्रकाश भोसले, माजी नगरसेवक कैलास तिजोरे आदींनी पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मनमानी कामकाज पद्धतीबाबत टीकेची झोड उठविली.
तालुक्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक काम करून दिलासादायक कामाची अपेक्षा असताना पुजारी हे जातीय व धार्मिक राजकारण करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नेवासा पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी निवेदन स्वीकारले.