पिंपळे निलख – सांगवी फाटा ते पिंपळे निलख जाणाऱ्या बीआरटीएस रस्त्याच्या कडेला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट पदपथ उभारले आहेत. या पदपथाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. तसेच या मार्गावर मद्यपी दारू पिऊन काचेच्या बॉटल व कचरा टाकून जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील कचऱ्याची साफसफाई करून गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सांगवीकडून वाकड दिशेला जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपूल संपल्यानंतर सांगवी फाटा ते पिंपळे निलखकडे बीअरटीएस रस्त्याच्या कडेला व पदपथाच्या बाजूला मद्यपान करून रिकाम्या बॉटल तसेच इतर कचरा टाकल्याने परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते, पदपथ निर्माण करणाऱ्या महापालिकेच्या कार्यावर काही विकृत कृत्य करणारे गालबोट लावत आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
या मार्गावर रस्त्याच्या आतील भागात मद्यपी मद्यपान करण्यासाठी बसल्याचे दिसून येतात. तसेच तृतीयपंथीयांचाही वावर येथे वाढल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या पादचारी, वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पुलाच्या बाजूला अंधाराचा फायदा घेत तृतीयपंथी ग्राहकांच्या शोधात उभा असतात. अश्लील वर्तन करून नागरिकांना त्रास देत आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासन व महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत असून, या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याचे मागणी नागरिकांनी केली आहे.
बीआरटीएस रस्त्यावर मुख्यतः वर्दळ असली तरी जाणारी व येणारे वाहनचालक वेगात असल्याने या भागात सहसा थांबत नाहीत. काही क्षणातच येथून निघून जात असल्याचा फायदा घेत रस्त्याच्या बाजूला गैरकृत्य करण्यासाठी या ठिकाणाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असून स्मार्ट सिटी व स्वच्छ व सुशिक्षित शहराला गालबोट लावण्याचे कृत्य या परिसरात होताना दिसत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या दृष्टीने असुरक्षित
या बीआरटी मार्गावर मोठ्या प्रमाणावर मद्यपींचा वावर वाढला आहे. तसेच तृतीयपंथींचे दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. याचा दिवसा आणि रात्री येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने येथे गस्त आणि बंदोबस्त वाढविणे गरजेचे आहे.