पानिपत – देशात 5 ऑगस्टला काही लोकांनी काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न केला. पण, काळ्या जादूने त्यांचे वाईट दिवस जाणार नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नामोल्लेख टाळून कॉंग्रेसवर निशाणा साधला. महागाई आणि बेरोजगारीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने 5 ऑगस्टला देशव्यापी निदर्शने केली. त्या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या कॉंग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान केले होते. त्याचा संदर्भ घेऊन मोदींनी येथे एका कार्यक्रमात कॉंग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
काळे कपडे परिधान केल्याने आपली निराशा संपेल असे त्यांना वाटते. पण, काळी जादू केल्याने ते जनतेचा विश्वास पुन्हा कमावू शकणार नाहीत याची जाणीव त्यांना नाही, असा शाब्दिक टोला त्यांनी लगावला. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून मोदींना प्रत्युत्तर दिले. काळा पैसा परत आणण्यासाठी काहीच न करू शकलेले आता काळ्या कपड्यांचा निरर्थक मुद्दा उपस्थित करत आहेत. पंतप्रधानांनी आमच्या समस्यांवर बोलावे असे देशातील जनतेला वाटते. मात्र, जुमलाजीवी काही-बाही बोलत राहतात, असे त्यांनी म्हटले.