इंदापूर (नीलकंठ मोहिते) – पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराचा बालेकिल्ला कित्येक वर्षापासून आहे. या मतदारसंघात व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत.
सहकार क्षेत्रात तज्ञ असणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजप च्या नव्या-जुन्या कार्यकर्ते नेत्यांना एकजुटीने पुढे नेण्यासाठी, आगामी काळात राजकीय डाव यशस्वी करण्याकरता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केला. तरीदेखील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे असलेला दांडगा राजकीय व सहकार क्षेत्रातील अनुभव हा भारतीय जनता पार्टीला सातत्याने पोषक ठरत आहे. शनिवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षाची कोअर कमिटी बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाने घेतली.
यानंतर राजकीय चक्रे शहरी व ग्रामीण भागामध्ये वेगाने भाजपमय होण्यासाठी पक्षातील होणार आहेत, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यातून भारतीय जनता पार्टीकडे खेचून घेण्यासाठी रणनीती आखण्याची जबाबदारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यशस्वी पार पडतील याची जाणीव भाजपला आहे. या निवडणुका संदर्भातील मार्गदर्शन, नवे राजकीय आखाडे नव्या-जुन्या भाजप पदाधिकारी नेत्यांनी जिल्ह्यातील हर्षवर्धन पाटील यांच्याकडून कोअर कमिटीच्या बैठकीत आत्मसात केलेल्या दिसतात.
भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षांपासून अविरतपणे काम पाहणारे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे संयोजक जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जिल्हा संघटन सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब गावडे, विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीतील बैठकीमध्ये पुणे येथे हजेरी लावली.
तालुक्यात करिष्मा कायम
हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांना इंदापूर तालुक्यामध्ये जनाधार लाभणार की नाही, असे अनेक राजकीय दिग्गजांना वाटत होते; मात्र हर्षवर्धन पाटील राजकीय मुरब्बी असल्यामुळे भाजप प्रवेशानंतर आपणाकडे असणाऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही सदस्याचा शिरकाव होऊ न देता, आपल्या विचाराच्या सहकारी संस्था हर्षवर्धन पाटील यांनी टिकवल्या आहेत. यातच दोन सहकारी साखर कारखाने, जिल्हा बॅंकेची एक जागा, बिनविरोध करत आपले वर्चस्व हर्षवर्धन पाटील यांनी सिद्ध केल्यामुळे, भारतीय जनता पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा करिष्मा निर्माण झालेला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात विशेष लक्ष
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सलग दोन वेळा, विधानसभेला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभूत झाले. तरी देखील बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, त्यांच्या अनुभवाचा राजकीय कारकिर्दीचा भाजपला फायदा होऊ शकतो. पाटील हे या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जवळकीचे नाते निर्माण करीत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचे बारामती लोकसभा मतदार संघावर अधिकचे लक्ष दिसत आहे.