बंगळुरू – कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार पाडण्यासाठी उत्सुक असले भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना आता भाजप श्रेष्ठींनीच सरकार पाडण्याच्या हालचाली थांबवा असा आदेश दिला असल्याचे वृत्त आहे. उलट आता येडियुरप्पा यांनाच प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे सांगण्यात येते. राज्यातील सरकार अस्थिर करू नका असा स्पष्ट आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनीच आपल्याला दिला आहे अशी माहिती आज खुद्द येडियुरप्पांनीच पत्रकारांना दिली.
ते म्हणाले की हे सरकार पाडण्याचा आमचा हेतूच नाही. उलट आघाडीचे सरकार पडावे असा प्रयत्न कॉंग्रेसचे नेते सिद्धरामैय्या हेच करीत असून त्यांनीच त्यांचे चार आमदार भाजपकडे पाठवून आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न चालवला होता. कॉंग्रेसचा हा डाव आमच्या लक्षात आला आहे. भाजपच्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुमारस्वामींचे सरकार पाडण्याचा कॉंग्रेसचा डाव वेळीच लक्षात आल्याने आम्ही आता हा प्रयत्न सोडून दिला आहे असे येडियुप्पा म्हणाले.
दरम्यान कर्नाटकातील भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांच्याच पदावर गदा येण्याचा संभव असून त्यांना या पदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येडियुप्पांचे सगळेच मुसळ केरात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.