मुस्लिमांना देशातून हद्‌दपार करण्याचा भाजपचा डाव – मेहबूबा

श्रीनगर – मुस्लीम व अल्पसंख्याकांना देशातून हद्‌दपार करण्याचा भाजपचा कुटिल डाव आहे, अशी टीका पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी केली. जम्मूतील कथुआ येथील सभेत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, पंतप्रधान मोदी राजकीय घराण्यांवर निवडणुकीत टीका करतात. पण नंतर दूत पाठवून आमच्या पक्षांशी आघाडीचे प्रयत्न करतात. नॅशनल कॉन्फरन्सशी 1999 मध्ये, तर पीडीपीशी 2015 मध्ये भाजपने युती केली होती. जर त्यांना 370 कलम रद्द करावेसे वाटते तर मग ते सत्तेला महत्त्व का देतात. सत्तेसाठी आमच्याकडे आघाड्या करण्याकरता दूत का पाठवतात. मुस्लीम व अल्पसंख्याक यांना देशातून घालवून देऊन भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत, असा आरोप त्यांनी ट्‌विटर संदेशात केला.
दरम्यान, कथुआ येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी, अब्दुल्ला व मुफ्ती या दोन कुटुंबानी जम्मू काश्‍मीरच्या तीन पिढया बरबाद केल्या, पण आम्ही त्यांना देशाचे तुकडे करू देणार नाही असे म्हटले होते. तसेच मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका करताना असे म्हटले होते, की काश्‍मिरी पंडितांचे खोऱ्यातून स्थलांतर कॉंग्रेसमुळे झाले. भाजप मात्र त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी नेऊन त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय राहणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.