मनसे म्हणजे मतदार, उमेदवार नसलेली सेना

भाजपकडून राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून टीका
मुंबई – मनसे म्हणजे मतदार आणि उमेदवार नसलेली सेना आहे, असे म्हणत भाजपने व्यंगचित्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोदींच्या विरोधात प्रचार करत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला तरीही चालेल. मात्र मोदी आणि अमित शहा यांना हटवा अशी आक्रमक भूमिक राज ठाकरे यांनी घेतली आहे. अशात आता भाजपने एक व्यंगचित्र ट्विट करून राज ठाकरेंवर टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या संदर्भातली तीन व्यंगचित्र दाखवत भाजपने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सुरूवातीला 13 आमदार होते, असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर 2014 असे लिहून तेच व्यंगचित्र दाखवण्यात आले आणि 13 पैकी एकच आमदार दाखवून मतदार नसलेली सेना म्हणजे मनसे असा अर्थ लिहिण्यात आला आहे. तर 2019 मध्ये राज तेच व्यंगचित्र दाखवले आणि त्यात राज ठाकरे एकटे पडले आहेत. आणि एक चाकी सायकलवर ते बसले आहेत आणि त्यांच्या आसपास कुणीही नाही असे म्हणत उमेदवार नसलेली सेना असा उल्लेख तिसऱ्या व्यंगचित्रात करण्यात आला आहे. प्रत्येकवेळी राज ठाकरेंचा करिष्मा असेही शीर्षक एका बाजूला देण्यात आले आहे.

ही टीका राज ठाकरेंना चांगलीच झोंबण्याची शक्‍यता आहे. आता या टीकेला राज ठाकरेंकडून किंवा मनसेकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेवर जोरदार टीका केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.