Mumbai Lok Sabha 2024| लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या एक-दोन दिवसात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. यातच आता भाजप मुंबईतून तीन विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे.
उत्तर-मध्य मुंबईतून पूनम महाजन खासदार आहेत. त्यांच्याजागी आशिष शेलार यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी मिळू शकते. भाजपकडून आशिष शेलार, पियुष गोयल आणि पराग शाह यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला जात नाही. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची बैठक झाली. लोकसभा जागा वाटपासाठी भाजप जास्तीच्या जागा घेणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं एनडीएसाठी 400 पारचं टार्गेट ठेवलं आहे यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या सत्तेतील पक्षांना काही जागा सोडाव्या लागू शकतात.
शिंदे गटाची जागा धोक्यात
उत्तर पश्चिम मुंबईतून सध्या शिंदे गटाचे गजानन किर्तीकर खासदार आहेत. पण ही जागा भाजपाला मिळू शकते. भाजपाकडून उत्तर पश्चिम मुंबईसाठी अमित साटम यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. तर दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा:
‘शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र अन् काँग्रेसची जोडवी’ कोणी केली भाजपावर जहरी टीका ?