नवी दिल्ली : करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभुमीवर भाजपने महिनाभर कोणतेही आंदोलन अथवा निदर्शने न करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी ही माहिती दिली. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी सर्व खासदारांना नागरिकांमध्ये करोना विषाणूबाबत जनजागृती करण्याची सूचना केली होती.
तसेच 15 एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण करू नये अशी सूचनाही केली होती. त्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नड्डा यांनी सांगितले.
पुढील एक महिन्यासाठी पक्ष कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही, असे भाजपने ठरवले असल्याचे नड्डा म्हणाले. लोकांची जमवाजमव टाळण्यासाठी आवश्यक असेल तेव्हा पक्षाचे चार ते पाच पदाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देतील. या निर्णयाबद्दल सर्व राज्य घटकांना सांगण्यात आले असून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे, असे नड्डा म्हणाले.