मास्क, सॅनिटायझर्सचा काळा बाजार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप
मुझफ्फरपूर : बिहारमधील न्यायालयात बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि हॅंड सॅनिटायझर्सचा काळा बाजार रोखण्यात वर्धन यांना अपयश आल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.
करोनाच्या धास्तीमुळे देशभरात मास्क आणि सॅनिटायझर्सच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्यांचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी त्यांची अवाच्यासवा किमतीत विक्री होत आहे, अशा आशयाच्या बातम्या पुढे येत आहेत.
त्या बातम्यांचा संदर्भ घेऊन भाजप नेते असणाऱ्या वर्धन यांच्या विरोधात मुझफ्फरपूरमधील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वर्धन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर 30 मार्चला सुनावणी होणार आहे. देशभरातील सध्याची स्थिती पाहता त्या सुनावणीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.