सातारा – लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढलेले साताऱ्याचे माजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्ली वारी निश्चित मानली जात आहे.
उदयनराजे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी, त्यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर एप्रिलमध्येच उदयनराजेंची निवड करण्यात येणार आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. मात्र, येत्या 24 फेब्रुवारीला भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून भाजपकडून त्यांना 24 फेब्रुवारीला राज्यसभेवर घेण्याची आणि मंत्रीपद देण्याची घोषणा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रात मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात आणखीनच बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून येऊन देखील त्या पक्षाला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. या परिस्थितीत आपली ताकद पुन्हा वाढविण्याची तयारी भाजपाने सुरू केलेली आहे.