कोयनानगर रस्ता : प्रशासनाने घेतली दखल, पुन्हा करावे लागले डांबरीकरण
ठेकेदाराने रातोरात उरकले होते रस्त्याचे काम उमेश अनारसे
पिंपरी – महापालिकेकडून शहरात ठिकठिकाणी रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. परंतु होणाऱ्या कामांचा दर्जा कितपत योग्य आहे हे पाहणे गरजेचे असते. महापालिकेच्या “फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोयनानगर सेक्टर 19 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ठेकेदाराला ते काम चांगलेच महागात पडले आहे. झालेले काम पूर्ण उखडून पुन्हा नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे ठेकेदार एम. पी. धोत्रे यांनी त्वरित रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा केले. महापालिकेच्या इतिहासात असे क्वचित घडताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात या ठेकेदाराची व कामाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका टेंडर काढून ठेकेदारांना कामे देते. आणि ठेकेदार जोमाने कामे सुरू करतात. परंतु ते किती दर्जेदार झाली आहेत हे पाहणे किंवा त्याचे मोजमाप योग्य रितीने होताना दिसत नाही. आपण शहरात ठिकठिकाणी झालेली रस्त्याची कामे पाहतो तेव्हा एक पाऊस झाला तर रस्त्यावर काही शिल्लक राहणार नाही, अशा रितीने निकृष्ट दर्जाची कामे केले जात आहेत. परंतु त्याकडे महापालिका प्रशासन व स्थापत्य विभाग डोळेझाक करताना दिसतो. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोयनानगर येथील रस्त्याचे काम धोत्रे या ठेकेदाराने केले. परंतु नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाने घेतलेली दखल यामुळे त्याला ते काम पूर्णपणे उखडून काढून नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करावे लागले.
कोयनानगर सेक्टर 19 मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम महापालिकेने ठेकेदार एम. पी. धोत्रे यांना दिले होते. परंतु त्यांनी या रस्त्याचे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने नागरिकांमध्ये महापालिका प्रशासन व ठेकेदाराविषयी मोठी संतापाची लाट निर्माण झाली. एक तर कित्येक दिवस रस्त्यांची कामे होत नाहीत. रस्त्यात पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे पडतात. पावसाळ्यात तर रस्त्याने चालणे देखील कठीण होत आहे. वाहनचालकांचे शहरात खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचे उदाहरणे पाहत आहे. तरीदेखील महापालिकेचे ठेकेदार रस्त्यांची कामे व्यवस्थित करताना दिसत नाहीत. ठेकेदार, प्रशासन व सत्ताधारी यांच्यात संगनमत असल्याने कामाचा दर्जा राहत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू उमटत आहे. काही सजग नागरिकांनी तक्रारी केल्याने महापालिका प्रशासनाने दखल घेत ठेकेदाराला रस्त्याचे काम पुन्हा करण्याचे आदेश दिले.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
कोयनानगर परिसरातील नागरिकांनी ठेकेदाराने केलेल्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. एकतर शहरात रस्ते लवकर होत नाहीत. निकृष्ट दर्जाचे रस्ते झाल्याने नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तसेच वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे शहरात चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. महापालिका ठेकेदारांना टेंडर काढून रितसर कामे करण्याची परवानगी देते परंतु ठेकेदार पैशांच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची कामे करत आहेत. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
कोयनानगर सेक्टर नंबर 19 मधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. हे काम महापालिका प्रशासनाने ठेकेदार एम. पी. धोत्रे यांना दिले होते. त्यांनी केलेल्या डांबरीकरणाचे पाहणी फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तेव्हा हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असे प्रथमदर्शनी पाहणीत दिसून आल्याने संबंधित ठेकेदाराला हे काम पुन्हा नव्याने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याने आता नव्याने रस्ता केला आहे.
– श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, फ क्षेत्रीय कार्यालय
ठेकेदाराने रातोरात रस्त्याचे डांबरीकरण केले. त्या कामात ठेकेदाराने रस्त्यावर लहान खडी पसरवून वरवरचे डांबर टाकून रस्ता तयार केला होता. तो व्यवस्थित झाला नसल्याने प्रभागाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यास पुन्हा रस्ता करण्यास भाग पाडले.
– योगिता नागरगोजे, नगरसेविका