मुंबई – अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे खासदारपद भूषवलेल्या चक्रवर्तींना भाजप आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे का, अशा चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत.
मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले होते. भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात दीड तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचा दावा चक्रवर्तींनी केला, परंतु आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे.
खूप दिवसापासून आम्हाला भेटायचे होते. पण आमच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नव्हता, असे मिथुनदा यांनी सांगितले. मोहन भागवत यांनी आज घरी येऊन नाश्ता केला. नागपूरला त्यांनी मला सहकुटुंब बोलवले आहे, असेही मिथुन चक्रवर्तींनी सांगितले.
मिथुन चक्रवर्ती हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार होते. मात्र वारंवार गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी स्वतःहून खासदारकीचा राजीनामा दिला होता.
पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये भाजप मिथुन चक्रवर्तींना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिथुन यांची भेट घेऊन मोहन भागवत यांच्या माध्यमातून भाजप चक्रवर्तींना आपल्याकडे खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.