आता मध्यप्रदेशात सुरू होणार भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’

मध्यप्रदेशातील सरकार पडले तर त्याची जबाबदारी आमची नाही
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सूचक वक्‍तव्य

भोपाळ: कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी पदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस, जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले होते. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात 99 आमदारांनी सरकारच्या बाजूनं, तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे कर्नाटक सरकार कोसळले. दरम्यान, आता कर्नाटकनंतर भाजपचे पुढचे टार्गेट राज्य मध्यप्रदेश असल्याने राज्यातील कॉंग्रेस पुर्णपणे हादरून गेल्याचे दिसत आहे.

मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होण्याची भीती कॉंग्रेस आमदारांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सूचक विधान केले. ‘आम्ही इथे सरकार पाडणार नाही. कॉंग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात कॉंग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,’ असे म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे ‘ऑपरेशन लोटस’चे संकेत दिले आहेत. कर्नाटक प्रमाणे मध्य प्रदेशात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष नसला, तरी कॉंग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यात कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे आता भाजपचे यापुढचे लक्ष्य मध्यप्रदेशच असल्याचे म्हटले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)