हवाई भरतीसाठी स्वत:च्या खिशातून रुपयाभर तरी खर्च करा !

तुषार रंधवे

भरती अभियानाला विरोध नाही : दत्ता साने

या भरती अभियानामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांना चांगल्या करिअरची संधी मिळणार आहे. त्यामुळे या अभियानाला माझा अजिबात विरोध नाही. मात्र या अभियानाचे आयोजन करण्याचे श्रेय लाटण्याला माझा ठाम विरोध आहे, अशी भूमिका साने यांनी घेतली आहे. तसेच महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे कोणाच्याही मागणीवरून निधी वाटपाचे परस्पर निर्णय घेतल्यास, ते भविष्यात अडचणीचे ठरू शकतात, अशी शंकादेखील त्यांनी यावेळी उपस्थित केली.

पिंपरी – हवाईदलाच्या भरतीसाठी भोसरीतील गावजत्रा मैदानावर मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी होणाऱ्या खर्चावरून नगरसेवक दत्ता साने यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर घणाघात केला आहे. “लांडगे स्वत:च्या संस्थेच्या नावाखाली महापालिकेकडून हा निधी लाटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढीच मिरवायची हौस असेल, तर जरा स्वत:च्या खिशातून रुपया तरी खर्च करा’, असा टोलादेखील त्यांनी आमदार लांडगें यांना लगावला आहे. या सुविधा पुरविण्याच्या नावाखाली इलेक्‍शन फंड गोळा करण्याचा उद्योग सुरू केला असल्याचा आरोप साने यांनी केला आहे.

भारतीय हवाई दलाच्या वतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि गावजत्रा मैदानावर भरती अभियान राबवत आहे. आमदार महेश लांडगे यांची महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन व अन्य दोन अशा एकूण तीन संस्थांच्या संयुक्‍त विद्यमाने हे अभियान राबविले जात असल्याचे फ्लेक्‍स शहरात ठिकठिकाणी लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर साने यांनी ही टिका केली आहे. याबाबत महापौर राहुल जाधव यांना निवेदन सादर करत या भरतीसाठी होणारा महापालिकेचा अनावश्‍यक खर्च टाळण्याची विनंती केली आहे. तसेच आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनादेखील याप्रश्‍नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

पैसा पालिकेचा, नाव आमदारांचे?
भारतीय हवाई दलाच्या वतीने केल्या जाणाऱ्या भरती अभियानासाठी महापालिका सुविधा पुरविणार असून, त्यासाठी येणाऱ्या 50 लाख, 2 हजार, 244 रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मात्र, या अभियानाचे आयोजन महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन व अन्य तीन संस्था करत असल्याची जाहिरात केली आहे. ही जनेतची दिशाभूल असल्याची साने यांची तक्रार आहे. हवाई दलाने भारतीय हवाई दलाने सदर कार्यक्रमासाठी मदतीची मागणी केली होती का? केली नसल्यास मनपाने कोणत्या आधारावर ही मदत केली आहे? हा खर्च कोणाच्या सांगण्यावरुन अथवा परवानगीने केला याची सविस्तर माहिती द्यावी.

या अभियानात महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशनचा सहभाग कोणत्या कायद्याने व कोणाच्या परवानगीने आहे. याबाबतचा पत्रव्यवहार व परवानग्यांची प्रत देण्यात यावी. आमदार लांडगे यांच्या फोटोच्या जाहिरातीसाठी महापालिका प्रशासनाने शासनाची रीतसर परवानगी घेतली आहे काय? यासाठी आतापर्यंत किती रक्कम खर्च झाली आहे? महापालिकेच्या इतिहासात यापूर्वी अशी मदत करण्यात आली आहे काय? आली असल्यास त्याची सविस्तर माहिती त्यांनी महापौर जाधव व आयुक्‍त हर्डीकर यांच्याकडून मागविली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)