नगर (प्रतिनिधी) – अहमदनगर शहर सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपात फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात डॉ. नीलेश शेळके यास नगरच्या अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. डॉ. शेळके यास अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास येत्या 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
रेखा जरे पाटील हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याच्या शोधार्थ काल पुण्यात गेलेल्या पथकास डॉ. शेळके हाती लागला. तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेवून नगरला आणले.
तथातपि, त्याच्याकडून बोठे याच्या तपासाविषयी विशेष काही माहिती न मिळाल्याने शेळके यास नगरच्या अर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आले होते. अर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पुढील सोपस्कर पूर्ण करत शेळके यास अटक केली.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्या मागावर असलेल्या पोलिसांना शेळकेचा ठावठिकाणा लागला होता. तोच बोठे यास मदत करत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यावरुन शेळके यांच्या पुण्यातील फ्लॅटवर पोलिसांनी छापा घातला होता.