इंदूर: खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या एका अजब वक्तव्याचा निषेध करताना कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपवरही शाब्दिक तोफ डागली. साध्वींसारख्या व्यक्तीला राजकारणात आणल्याबद्दल भाजपने आत्मचिंतन करावे, असे ज्योतिरादित्य यांनी म्हटले.
भाजप नेत्यांच्या जीविताला हानी पोहचवण्यासाठी विरोधकांकडून मारक शक्तीचा वापर केला जात असल्याचे साध्वींनी सोमवारी म्हटले. त्यावर ज्योतिरादित्य यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात दर्जा, मर्यादा यांची विशिष्ट पातळी जपायला हवी. राजकीय किंवा बाहेरील व्यक्तीकडून राजकारणाला हीन केले जाणार असेल तर निषेध व्हायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. सुषमा स्वराज, अरूण जेटली आणि बाबूलाल गौर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर साध्वींनी संबंधित वक्तव्य केले होते.