कोल्हापूर – राज्यसभेचे उमेदवारीवरून युवराज संभाजीराजे यांनी काल मन मोकळे केले आहे. आमच्यासाठी हा विषय संपला आहे. इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेतला. खासदार संजय राऊत हे दोन दिवसासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांची हॉटेल सयाजी येथे पत्रकार परिषद झाली.
राजकारण करत असताना कोणत्या तरी पक्षाचा हात धरावा लागतो. राज्यसभेसाठी 42 मतांचा प्रश्न होता. राज्यात विरोधी पक्ष आहे,पण तो विरोधासाठी विरोध करताना दिसतो. त्यामधून त्यांना कोणता असुरी आनंद होतो कोणास ठाऊक. महा विकास आघाडी भक्कम आहे. ठामपणे महाविकासआघाडीची वाटचाल सुरू आहे. असेही राऊत यांनी सांगितले.
युवराज संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही अशी टीका केली होती. याकडे लक्ष वेधले असता खासदार राऊत म्हणाले शिवसेना हा आमचा पक्ष आहे. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे निर्णय घेतात. आमच्या पक्षाच्या निर्णया संबंधी आम्ही भाजपाला का उत्तर द्यायचे. राज्यसभेची उमेदवारी हा छत्रपती आणि आमच्यातील विषय आहे.
संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन मन मोकळे केले आहे. तेव्हा या प्रश्नात इतरांनी चोंबडेपणा करू नये. भारतीय जनता पक्षाने संभाजीराजेंना 42 मते द्यावीत. मुळात राजकारणात करिअर करताना कोणत्या तरी पक्षाचा आधार घ्यावा लागतो. देशभरातील अनेक राजघराण्यातील व्यक्ती या वेगवेगळ्या पक्षात सक्रिय आहेत. संभाजीराजे यांना मी विचारणा केली होती. आता हा विषय संपला आहे. शिवसेनेने आता जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे.