जळगाव : भुसावळमध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी यापूर्वी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले होते. यानंतर आता भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.
भुसावळमध्ये भाजपच्या 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिल्याचं बोललं जातंय.
जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही, असा टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी बोलताना लगावला. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.
‘जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा आपण मार्ग काढू. निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असता तर बरं झाले असते, जळगाव जिल्ह्यात आज परिस्थिती वेगळी असती, जळगावात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, खडसे आधी आले असते तर पूर्ण जिल्हा आपला असता,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.