नंदुरबार : भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह कुटुंबातील सर्वच सदस्याना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये हिना गावित यांचे वडील आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, मातोश्री डॉक्टर कुमुदिनीताई गावित आणि लहान बहीण कुमारी डॉक्टर सुप्रियाताई गावित यांचा समावेश आहे. खुद्द हिना गावित यांनीच याबद्दल माहिती दिली आहे.
खासदार हिना गावित यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. हिना गावित यांनी म्हटले आहे की, “आपल्या सर्वांचे लाडके नेते, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माझ्या मातोश्री डॉक्टर सौ कुमुदिनीताई गावित,माझी लहान बहीण कुमारी डॉक्टर सुप्रियाताई गावित व मी स्वतः आमची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गावित साहेब व आई खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर मी व सुप्रियाताई होम क्वारंटाईन आहोत आमची सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणालाही कुठलेच लक्षणे नाहीत.काळजी करण्यासारखे काहीच नाही”.
पुढे हिना गावित म्हणतात, “गेल्याआठ ते दहा दिवसात आमच्या चौघांशी संपर्कात आलेल्या सर्वांनी होम क्वारंटाईन होऊन कोरोना चाचणी करून घ्यावी अशी सर्वाना विनंती करते.आपल्या सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेतच म्हणून आपणास विनंती करते की रुग्णालयात किंवा घरी कोणीही भेटायला येऊ नये. लवकरच उपचार पूर्ण करून झाल्यावर आम्ही पुन्हा मतदार संघाच्या सेवेमध्ये तत्पर होऊ”.
दरम्यान, या फेसबुक पोस्टच्या काही तासापूर्वी डॉ. हिना गावित यांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी कुटुंबातील इतर सदस्याचा उल्लेख केला नव्हता. पण त्यानंतर दोन तासानंतर परत एक पोस्ट करत त्यांनी त्यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.