वॉरसॉ, (पोलंड) – रशिया आणि पोलंडच्या सीमेजवळ ३ अज्ञात बलून आढळून आले असल्याचे पोलंडमधील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे. हे बलून हवामान निरीक्षणासाठी सोडले गेले असल्याचा अंदाज आहे.
पोलंडच्या इशान्य सीमेजवळ रशियाच्या कलिनीग्राडपासून १०० किलोमीटर आणि पोलंडमधील माझुरी लेक जिल्ह्यापासून २० किलोमीटर अंतरावर आढळलेल्या या बलूनवर सिरीलिक लिपीमध्ये काही संदेश देखील लिहीलेले आहेत.
या तिन्हीपैकी एकाही बलूनमध्ये कोणतेही विशेष उपकरण बसवलेले नाही, असे निरीक्षण स्थानिक रेडिओ स्टेशनने नोंदवले आहे. या बलूनबद्दल लष्कराला कळवण्यात आले असून लष्कराकडूनच या बलूनची पहाणी केली जाणार आहे.
यापूर्वीही हवामान निरीक्षणासाठी सोडलेले बलून या भागामध्ये आढळून आले होते. पोलंडची सीमा रशिया आणि युक्रेनला लागून आहे. पोलंडने युक्रेनला युद्धामध्ये मोठी मदतही केली आहे.