सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उर्दू भाषेचे धडे

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; दि. 13 ते 27 जानेवारी अशी मुदत

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उर्दू भाषेतील पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठातर्फे प्रथमच उर्दू भाषेचा अभ्यासक्रम हिंदी विभागांतर्गत सुरू करण्यात येत आहे. याच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले.

विद्यापीठातील उर्दू पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास दि. 13 ते 27 जानेवारी अशी मुदत आहे. त्यानंतर शंभर गुणांची प्रवेश परीक्षा राहील. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता 30 इतकी असून, हा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे.

या अभ्यासक्रमासाठी किमान बारावी उत्तीर्णासह पदवी, पदव्युत्तर, एमपीएल, पीएचडीचे विद्यार्थी अर्ज करू शकतील, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली. ऑनलाइन अर्जासाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 500 रुपये, तर मागासवर्गीय गटांतील विद्यार्थ्यांना 350 रुपये शुल्क निश्‍चित केले आहे.

उर्दू भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे सातत्याने मागणी होत होती. त्यास प्रतिसाद देत विद्यापीठाने हिंदी विभागप्रमुख डॉ. सदानंद भोसले यांच्या अध्यक्षतेसाठी समिती नेमली. या समितीने अभ्यासक्रमाची रचना तयार केली. त्यांनतर हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उर्दू वाचन, उर्दू लेखन, उर्दू श्रवण आणि उर्दू संभाषण अशी चार कौशल्य शिकता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.