भाजप खासदाराची मंदिरातील पुजाऱ्यांना शिविगाळ; गुन्हा दाखल

डेहरादून – उत्तराखंडच्या जागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी उत्तर प्रदेशच्या आवलाचे खासदार धर्मेंद्र कश्‍यप आले होते. त्यांच्यावर मंदिरातील पुजाऱ्यांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

करोना काळात घातलेल्या निर्बंधामुळे मंदिर बंद करण्याची वेळ झाली असल्याचे पुजाऱ्यांनी खासदारांना सांगितले. पण म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मंदिर प्रशासनाने पोलिसात केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलैला हा संपूर्ण प्रकार घडला. दुपारी 3.30 च्या दरम्यान खासदार धर्मेंद्र कश्‍यप आणि तिघे जण मंदिरात आले होते. संध्याकाळी 6.30 पर्यंत त्यांनी मंदिरात ठाण मांडले होते. कोरोना निर्बंधामुळे संध्याकाळी 6 वाजता हे मंदिर बंद होते.

मंदिर प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार, पुजाऱ्यांनी खासदारांना मंदिरातून बाहेर जाण्याची विनंती केली. पण त्यांनी दमदाटी करत शिवीगाळ केली. या प्रकरणी खासदार धर्मेंद्र कश्‍यप आणि तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर कॉंग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तराखंडचे कॉंग्रेस नेते गोविंद सिंह कुंजवाल यांनी भाजप खासदाराच्या गैरवर्तवणुकीनंतर ठिय्या आंदोलन केले. तर दुसरीकडे उत्तराखंडचे भाजप अध्यक्ष मदन कौशिक यांनी याप्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.