Anil Bonde: भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मागील तीन दिवसांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान अनिल बोंडे यांच्यावर अज्ञातांनी दगडफेक केली. याप्रकरणी तिवसा पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तिवसा येथे भाजपचे उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी राज्यस्तरीय किसान शंकरपटाचे आयोजन केले होते. शनिवारी बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमाचा अखेरचा दिवस होता. भाजपा खासदार अनिल बोंडेही या बैलगाडा शर्यतीला उपस्थित होते. यावेळी गर्दीतून तीन-चार दगड त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आले. यातील एक दगड अनिल बोंडेंच्या खांद्याला लागला. यामध्ये त्यांच्या डाव्या खाद्यांला दुखापत झाली असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
अनिल बोंडे यांनी याप्रकरणी तिवसा पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे नेमका दगड कोणी भिरकावला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणाचा पोलिस तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. दुसरीकडे, अनिल बोंडे यांच्या झालेल्या दगडफेकीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी फडणवीस यांचा राजीनामा मागते ते वैयक्तिक कारणासाठी नाही. भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात अपयश फडणवीस यांचे नाही, पण नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ते सरकारचं अपयश आहे.”